अकोला: जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या ७४६ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यात केवळ ४४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २३६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर २०६ रुग्ण हे जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. वास्तविक ॲक्टिव्ह रुग्ण आणि जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीमध्ये ३०४ रुग्णांची तफावत दिसून येत आहे. उर्वरित ३०४ रुग्ण गेले कुठे, हा संशाेधनाचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद असल्याने लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशा रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड डेडिकेटेट रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दररोज पॉझिटिव्ह येणारे रुग्ण व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे दिली जाते. त्यानुसार, जिल्ह्यात सध्यस्थितीत ७४६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मात्र वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या केवळ ४४२ आहे. यापैकी २३६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर २०६ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या दोन्ही आकडेवारीनुसार, ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत ३०४ रुग्णांची तफावत दिसून येते. ही तफावत नेमकी कशी, हा संशोधनाचा विषय असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
डिस्चार्ज रुग्णाची माहिती अद्ययावत नाही?
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यंतरी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ज्या रुग्णांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण झाला,अशा रुग्णांची माहिती अद्ययावत करण्यात आली नाही. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा फुगलेला दिसून येत असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, सत्य काय हे तपासानंतरच समोर येईल.
रुग्णालयनिहाय रुग्णसंख्या
रुग्णालय - उपचार घेत असलेले रुग्ण
सर्वोपचार रुग्णालय - १११
बिहाडे हाॅस्पिटल - २२
आयकॉन - २४
ओझोन २२
सुर्यचंद्र - ६
मुर्तिजापूर - ८
स्कायलार्क - १३
---------------------
एकूण - २०६
होम आयसोलेशनमधील रुग्ण संख्या
२३६
होम आयसोलेशनमधील रुग्णांना दहा दिवसांत डिस्चार्ज केल्या जाते. त्यानुसार माहिती अद्ययावत होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील माहिती अद्ययावत होते, मात्र महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या जास्त असल्याने ती माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला