जिल्ह्यात १५ फेब्रुवारीनंतर कोविडचा फैलाव झपाट्याने होऊ लागला. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जो रुग्ण नियमांची पूर्तता करेल केवळ अशाच रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सातपैकी ४ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये केवळ १५७ रुग्णांना दाखल करण्यात आले, तर कोविड रुग्णालयांमध्ये ४५४ रुग्ण दाखल असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या शिवाय, जवळपास ११०० रुग्ण अजूनही गृह विलगीकरणात असून, १७११ रुग्णांची नोंद होत आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २८७० आहे. ही स्थिती पाहता एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी उर्वरित हजारावर रुग्णांची नोंद दिसून येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हे रुग्ण नेमके गेले कुठे, या रुग्णांचा आरोग्य विभागाशी संपर्क झाला की नाही, असा गंभीर प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
एकूण कोविड केअर सेंटर - ७
उपलब्ध खाटा - ७५०
दाखल रुग्ण - १५७
रिक्त खाटा - ५९३
एकूण कोविड रुग्णालय - १४
एकूण खाटा - ८४९
दाखल रुग्ण - ४५४
रिक्त खाटा - ३९५
रुग्णांचे नाव, पत्ता चुकीचा
कोविड चाचणीवेळी अनेक रुग्ण चुकीचा संपर्क क्रमांक, तसेच चुकीचा पत्ता देत असल्याची माहिती समोर आली. शिवाय, माहिती अद्ययावत करताना संबंधितांचे नावही चुकीचे नमूद केल्या जात असल्याने अहवाल तयार करताना अनेक अडचणी येतात. परिणामी अनेक रुग्णांशी संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध लागत नाही. या संदर्भात गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे.