लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मेपासून रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे नागरिक रेल्वे स्थानकावर विचारणा करण्यासाठी गर्दी करीत आहेत. प्रवास आणि चौकशी करणाऱ्यांची येणारी गर्दी पाहता रेल्वे मंडळ भुसावळ आणि अकोला जिल्हा प्रशासन यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.रेल्वे मंडळ भुसावळच्या आदेशानुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाउनला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ मेपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णत: बंद राहणार आहे. कोणत्याही स्थानकाहून गाड्या निघणार नाहीत. पॅसेंजर गाडी, मेल एक्स्प्रेस, गाडी, मेमो ट्रेन, सभी ब्रांच लाइन, दुरंतो एक्स्प्रेस, लोकल ट्रेन धावणार नाही, असे भुसावळ मंडळाने कळविले आहे. यादरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या माल वाहतुकीसाठी आणि पार्सलसाठी गाड्या सोडल्या जात आहेत.
रेल्वे स्थानकावर गर्दी टाळा महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाºया नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल, त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.