अकोला : जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा मुद्दा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठेचा केल्याने पक्षाच्या प्रादेशिक व राष्ट्रीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. परिणामस्वरूप अकोला जिल्ह्यात भाजपच्या स्टार प्रचारकांसह इतर नेत्यांच्याही सभांचे आयोजन अद्यापपर्यंतही झालेले नाही. नेत्यांमधील या सुंदोपसुंदीने उमेदवारांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. अकोला पश्चिम आणि बाळापूर या दोन मतदारसंघातील उमेदवारीवरूनही भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. अकोला पूर्व, बाळापूर आणि जिल्ह्यातील आणखी काही मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बाळापूर मतदारसंघ महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेला सोडण्याचा निर्णय जवळपास झाला होता; मात्र ऐनवेळेवर या मतदारसंघातूनही भाजपच्या उमेदवाराला रिंगणात उतरविण्यात आले. परिणामस्वरूप भाजपचे प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते नाराज झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील रद्द झालेली सभा याचाच परिपाक आहे. गडकरी यांनी बुधवारी आकोट येथील सभेला संबोधित केले; मात्र त्यांनी अकोला येथे सभा घेणे टाळले. त्यामुळे अकोल्यात स्टार प्रचारकांच्या सभा होण्यासाठी, आता भाजपच्या उमेदवारांनी थेट राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. एकूणच नेत्यांमधील चढाओढीच्या राजकारणामुळे उमेदवारांची धडधड वाढली आहे.
कॉँग्रेस, भाजप, राकॉँमध्ये घमासान
By admin | Published: October 10, 2014 1:17 AM