महापालिकेच्या नियाेजनशून्य कारभारामुळे यंदा मान्सूनपूर्व नालेसफाई झालीच नाही. त्याचे परिणाम अकाेलेकरांना भाेगावे लागत आहेत. नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता सखल भागातील घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये शिरत आहे. आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांवर आराेग्य निरीक्षकांचे कवडीचे नियंत्रण नसल्याने साफसफाईचा पुरता बाेजवारा उडाल्याची स्थिती आहे. प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी साफसफाईच्या कामात केलेले बदल स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळे साफसफाईची समस्या निकाली न निघता त्यात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत निमा अराेरा यांनी कचरा संकलन करणारे ३२ ट्रॅक्टर अचानक बंद करीत मनपाच्या मालकीचे १६ ट्रॅक्टर व चार टिप्पर कामाला लावले. परंतु ही पर्यायी व्यवस्था अत्यंत ताेकडी ठरत असल्याने शहरातील बाजारपेठेत कचऱ्याचे अक्षरश: ढीग साचले आहेत.
मुख्य बाजारपेठेत घाणीचे ढीग
संपूर्ण शहराची बाजारपेठ प्रभाग क्रमांक ११ मध्ये स्थिरावली आहे. यामध्ये प्रामुख्याने जनता भाजीबाजार, जैन मंदिरालगतचा जुना भाजीबाजार, जुना कापड बाजार, नवीन कापड बाजार, काेठडी बाजार, दाना बाजार, किराणा बाजार, भंगार गल्ली, खारी बावडी,
साेने-चांदी मार्केट, फरसाण मार्केट, गांधी चाैकातील चाैपाटी आदींचा समावेश हाेताे. साहजिकच या भागात ओला व सुका कचऱ्याचे प्रमाण जास्त असून बाजारपेठेत ठिकठिकाणी घाणीचे ढीग आहेत.----------
संपूर्ण शहराची बाजारपेठ प्रभाग क्रमांक ११ मध्ये स्थिरावली आहे. मनपाची पर्यायी व्यवस्था ताेकडी ठरत असल्याने याविषयी आयुक्तांना वारंवार सूचना केली. त्यावर ताेडगा निघत नसल्याने नागरिक व व्यापारी घाणीच्या विळख्यात कसे राहत असतील याची जाण व्हावी म्हणून मनपा आवारात कचरा टाकला.
- डाॅ. जिशान हुसेन, नगरसेवक, प्रभाग क्र. ११