- राजेश शेगोकार
अकोला: बुलडाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे सानंदा हे पहिलेच उमेदवार असावेत. सानंदा यांनी मंगळवारी रात्री ‘लोकमत’ शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता; मात्र मी दोन महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले होते, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे पहिल्या यादीतच माझ्या नावाचा समावेश होण्याची शक्यता होती; मात्र २८ सप्टेंबरला दुपारी मुुकुल वासनिक व बाळासाहेब थोरात यांना मी निर्णयावर ठाम असल्याचे लेखी पत्र देऊन दूरध्वनीवरूनही कळविले होते, असेही सानंदा म्हणाले विशेष म्हणजे याबाबत त्यांनी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकही काढले असून त्यामध्ये निवडणुक न लढविण्याबाबतची कारणे नमूद केलीआहेत.
मेळाव्यात गैरहजर राहून दिले होते संकेत
सानंदा हे निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. त्यांनी खामगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला; मात्र तेच मेळाव्याला हजर नव्हते. मुलाच्या आजारपणामुळे त्यांना मुंबईला जावे लागले होते, असा खुलासा त्यांनी केला असला तरी या निमित्ताने त्यांची न लढण्याची मानसिकता समोर आली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.