युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अॅड. प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:13 PM2018-09-30T12:13:14+5:302018-09-30T12:15:49+5:30
अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.
- राजरत्न सिरसाट
अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.
केंद्र, राज्यातील सरकारला जनता कंटाळली असून, जनतेलाच बदल हवा आहे. त्यादृष्टीने आम्ही जनतेसमोर पर्याय ठेवला आहे. वंचित बहुजन समाजाला सोबत घेऊन आम्ही राज्यात येत्या विधानसभेत चांगली कामगिरी करू न दाखवू. सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी राफेल विमान खरेदीबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्या बचावासाठी राज्यातील एकाही काँग्रेस नेत्याने बोलू नये, याचा अर्थ कार्यकर्ते काँग्रेसच्या बाजूने नाहीत, असा घ्यावा का, असा प्रश्नही अॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. मल्लिकार्जुन खडगे यांनी याबाबत व्यक्तिगत मत मांडले; पण वरिष्ठ नेते याबाबत अधिकृतपणे खंडन करायला तयार नाहीत, म्हणजे शरद पवारांनी उघड भूमिका घेऊनही राष्टÑवादी काँग्रेससोबत काँग्रेस युती करीत असेल, तर आता लोकांनीच यामागील निष्कर्ष काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत युती केल्यानंतर अनेकांनी टीका केली, याबाबत त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. निवडणूक आयोगाने एमआयएम पक्षाची नोंदणी करू न मान्यता दिली, तेव्हा एमआयएम हा पक्ष सेक्युलर आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कोरेगाव-भीमा प्रकरणात आम्ही आमचे म्हणणे आयुक्तांपुढे मांडले आहे. खरेतर या प्रकरणात लोकांंची साक्ष घेण्याअगोदर ज्या संघटना जबाबदार आहेत, त्यांची व सरकारी अधिकाऱ्यांची सुनावणी घेणे गरजेचे आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तो पवारांचा अहंकार
शरद पवार यांनीच तुम्हाला निवडून आणल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यासंदर्भात आंबेडकर यांनी पवार यांचा तो अहंकार असल्याचे सांगितले. माणसात एवढाही अहंकार नसावा, असेही ते म्हणाले.