अकोला: भूसंपादन कायद्यातील बदल रद्द करण्यासह शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर उपाययोजना करून न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. भूसंपादन कायद्यात बदल करण्यात आल्याने, शेतकरी हितास धोका निर्माण करणारा हा बदल रद्द करण्यात यावा. दुष्काळी परिस्थितीत सरकारने पॅकेजद्वारे कोरडवाहू शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार, ओलिताच्या शेतकर्यांना हेक्टरी ५0 हजार रुपये मदत द्यावी, शेतकर्यांकडील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे व संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे, पुढील हंगामासाठी शेतकर्यांना बियाणे व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या. तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी करण्यात याव्या, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, बाबाराव विखे पाटील, डॉ.सुभाषचंद्र कोरपे, मो.राजीक, उषा विरक यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतक-यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने दिले धरणे
By admin | Published: January 22, 2015 1:58 AM