- राजेश शेगोकार
अकोला : १९८४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर विजयासाठी चाचपडणाऱ्या काँग्रेसला पक्षांतर्गत संघर्ष संपवून एकजुटीने समोर जावे लागणार आहे. गेल्या महिन्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा महाराष्ट्राचे निरीक्षक आशिष दुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, १२ नोव्हेंबर स्वराज्य भवन येथे प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाºयांमध्येच शाब्दीक चकमक उडाली होती. त्यामुळे पश्चीम वऱ्हाडात येत असलेल्या संघर्ष यात्रेच्यानिमत्ताने काँग्रेस मधील पक्षांतर्गत संघर्ष दूर करून एकजुटीचे प्रदर्शन करण्याची संधी आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मिळेल त्या संधीचा शक्तीप्रदर्शनासाठी फायदाही करून घेतला जात आहे. काँग्रेसलाही ४ डिसेंबरच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने ही संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची एकजूट होते का हे पाहणे महत्वाचे ठरते.महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे भाजपा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. अमरावती विभागाचा या यात्रेचा शुभारंभ ४ डिसेंबरला यवतमाळ जिल्ह्यातून होणार आहे.जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी भाजपा, शिवसेनेसह भारिप बमसंही सक्रीय झालेला असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अजूनही आघाडीच्या घोषणेची वाट पाहत आहे. भारिप-बमसं काँग्रेस आघाडीत समाविष्ट झाली तर कॉग्रेसचे पदाधिकारी ‘वºहाडी ’ म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र जर महाआघाडी झालीच नाही तर काँग्रेसला राष्टÑवादीच्या सोबतीने अकोल्यात उमेदवार द्यावा लागेल. त्यासाठी संभाव्य उमेदवारांना आतापासूनच कामाला लागण्याचे संकेत द्यावे लागणार आहेत. संघर्ष यात्रा ही काँग्रेससाठी सुर्वणसंधी आहे.