काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:43 PM2019-05-25T12:43:10+5:302019-05-25T12:44:29+5:30

भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल.

Congress high command not hear anyone | काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

Next

- राजेश शेगोकार
अकोला: दोन वर्षांपूर्वी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष पदावर बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर येथील तरुण पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारत या नियुक्तीला विरोध करून चक्क आत्मक्लेष आंदोलनही केले होते; मात्र काँग्रेसच्या हायकमांडने त्यांच्या निर्णयात कोणताही बदल केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार निश्चित करताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांच्याऐवजी शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्याची मागणीही बेदखल करण्यात आली तर अकोल्यातून मुस्लीम उमेदवार देऊ नये, या कार्यकर्त्यांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. २०१४ च्या मोदी लोटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला नाही. त्यामुळे २०१९ च्या दारुण पराभवानंतर काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे, असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांच्या चर्चेतून समोर आला आहे.
अकोल्यात गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसला स्वबळावर लोकसभा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. भाजपाने लागोपाठ विजय मिळवित अकोल्याच्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आव्हानच मोडून काढले आहे. या पृष्ठभूमीवर पक्षाची विचारधारा जिवंत ठेवत काम करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी ‘बदल’ होईल, या आशावादावर काम करीत होती. २०१९ मध्ये नव्या दमाचा उमेदवार देऊन काँगे्रस पक्ष कार्यकर्त्यांना चैतन्य देईल, ही अपेक्षा फोल ठरली अन् त्याच ठिकाणी काँग्रेसच्या पराभवाचा पाया रचला गेला. पटेल यांचे नाव जाहीर होताच, काँग्रेसच्या गोटातून सर्वांनीच काँग्रेसश्रेष्ठींच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. खासदार संजय धोत्रे यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची ताकदच काँग्रेसची नव्हती. डॉ. अभय पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या उमेदवारीचे वारे मतदारसंघात फिरविले अन् ऐनवळी तांत्रिक कारणांनी घात झाल्याने पटेल यांच्या रूपाने मुस्लीम समाजाला खूश करण्याचा प्रयोग काँग्रेसने पुन्हा एकदा केला; मात्र हा प्रयोग काँग्रेसच्या विजयासाठी कमी अन् अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची कोंडी करण्यासाठी अधिक होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसनेच ‘काँग्रेस’चा ‘गेम’ केला आहे.
खरे तर काँग्रेसचे संघटन केवळ कागदावरच उरले आहे. संघटनेत बदल नाही, नव्या चेहºयांना स्थान नाही, अजूनही सत्तेत आहोत अशा स्वरूपाच्या वागण्यात बदल नाही, दुसºया फळीची निर्मितीची नाही, अशी अनेक नकारात्मक कारणांची मोठी यादी सांगता येईल. मोदी लाट हे काँग्रेसच्या परिणामांचे एकमेव कारण नाहीच, भाकरी न फिरविणे हेही सर्वात मोठे कारण आहे. मोदी लाटेतही दुसरा क्रमांक टिकविणारी काँग्र्रेस आज तिसºया क्रमांकावर फेकली गेली आहे. याउलट मुस्लीम मतांमध्ये मोठे धु्रवीकरण न करताही अ‍ॅड. आंबेडकरांची ‘वंचित’ आघाडी दुसºया क्रमांकावर गेली. याचे कारण त्यांनी बदल केला. भारिप-बमसं पक्ष विलीन करण्याचीही हिंमत दाखविली. दुसरीकडे सर्वकाही संपले असतानाही काँग्रेस बदल स्वीकारायला तयार नाही. यामध्येही पराभवाचे कारण दडलेले आहे. भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल. एकाच निवडणुकीत बदल होईल, अशी अपेक्षा न ठेवता नव्या दमाची संघटना बांधावी लागेल. त्याची सुरुवात येत्या विधानसभा निवडणुकीत करावी लागेल. त्यासाठी ‘भाकरी’ फिरविणे हाच उपाय आहे, अन्यथा आज भाकरी करपली आहे म्हणून २२ टक्के मतदार तरी सोबत आहेत. उद्या भाकरी पूर्णपणे जळून गेल्यावर काँग्रेसचा पंजा उंचावयालासुद्धा ‘हात’ राहणार नाही!

 

Web Title: Congress high command not hear anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.