काँग्रेसच्या नेत्यांनाे, आंदाेलनात ‘कायकर्ते’ आणा! पदाधिकाऱ्यांना दिले टार्गेट; निष्क्रिय नेत्यांवर हाेणार कारवाई
By राजेश शेगोकार | Published: March 28, 2023 06:07 PM2023-03-28T18:07:23+5:302023-03-28T18:07:39+5:30
काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलनात कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
अकाेला : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी किंवा प्रदेशकडून नियाेजित केलेल्या आंदाेलनात, जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या आंदाेलनात अनेक पदाधिकारी सहभागी हाेत नाहीत. याची गंभीर दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या निर्देशावरून आता पदाधिकाऱ्यांना पदानुसार आंदाेलनात कार्यकर्ते आणण्याचे ‘टार्गेट’ ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जे पदाधिकारी कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट पूर्ण करणार नाहीत, त्यांची माहिती जिल्हाध्यक्षांनी कळविल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार २८ मार्च राेजी सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून याबाबत सूचित केले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, प्रश्न तसेच राजकीय मुद्द्यांवर विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण अथवा सत्याग्रह असे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले जात असतात. पक्षीय कार्यक्रम असो वा जनतेच्या समस्यांसाठी घेतलेला कार्यक्रम असो, जिल्हास्तरावर सर्वच सन्माननीय पक्ष पदाधिकारी यांनी स्वतः सहभागी होत आपल्याबरोबर इतर कार्यकर्ते यांचा सहभागही जास्तीत जास्त संख्येने करणे अपेक्षित आहे.
परंतु, अनेक पदाधिकारी अशा पद्धतीच्या आंदोलन, मोर्चात सहभागी होत नाहीत, असे निर्दशनास आले आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांत पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेऊनही पक्षाचे काम करत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देण्यासाठी पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविण्याची सूचनाही जिल्हाध्यक्षांना केली आहे.
असे आणावे कार्यकर्ते -
- प्रदेश पदाधिकारी किमान ४० कार्यकर्ते
- जिल्हा पदाधिकारी २० कार्यकर्ते
- ब्लॉक स्तर पदाधिकारी १० कार्यकर्ते