काँग्रेस आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:55 PM2019-09-21T15:55:20+5:302019-09-21T15:55:25+5:30
मुस्लीम मतांची संख्या लक्षात घेता येथे आघाडी व ‘वंचित’मध्ये उमेदवार निश्चितीसाठी सध्या सावध पवित्रा घेतला जात आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीचे राजकारण आता वेगाने फिरू लागले आहे. काँग्रेस आघाडी, भाजपा-सेना युती व वंचित बहुजन आघाडी, असा तिरंगी सामना प्रत्येक मतदारसंघात सध्यातरी अपेक्षित असून, मुस्लीम व धर्मनिरपेक्ष मतांवर भिस्त ठेवून असलेल्या आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. अकोला पश्चिम व बाळापूर या दोन मतदारसंघांतील मुस्लीम मतांची संख्या लक्षात घेता येथे आघाडी व ‘वंचित’मध्ये उमेदवार निश्चितीसाठी सध्या सावध पवित्रा घेतला जात आहे.
काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमधील जागा वाटपात पाच मतदारसंघांपैकी मूर्तिजापूरसह अकोला पश्चिम हे दोन मतदारसंघ राष्टÑवादीला देण्यात आल्याची माहिती आहे. या जागा वाटपावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसल्याने काँग्रेस व राष्टÑवादीमधील इच्छुक अजूनही आशावादी आहेत. अकोला पश्चिम व बाळापूर या दोन मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतांची संख्या पाहता येथून मुस्लिमांसह मुस्लिमेतर मते मिळविणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न आघाडी व ‘वंचित’कडून होणार आहे. त्यामुळे एका पक्षाने मुस्लीम उमेदवार दिला तर दुसरा पक्ष मुस्लिमेतर उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘वंचित’कडून बाळापुरात डॉ. रहेमान खान यांचे नाव चर्चेत होते; मात्र आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिम राष्टÑवादीकडे आल्याची माहिती समोर येताच वंचितकडून राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी मुस्लीम उमेदवार देण्याच्या मागणीची खेळी समोर आली. ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी तसे पत्रकच काढून डॉ. रहेमान खान यांना अकोला पश्चिममधून उमेदवारी देण्याची मागणी केली. ही मागणी म्हणजे काँग्रेस आघाडीवर दबाब टाकण्याची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे बाळापुरात काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार आल्यास तेथेही नव्या पर्यायाचा विचार वंचितकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र मुस्लिमेतर उमेदवाराला आघाडीने संधी दिली तर वंचित तेथे डॉ. रहेमान खान यांना मैदानात उतरवू शकते, अशी चर्चा आहे.