राजरत्न सिरसाट
अकाेला : भाजपाविराेधात लढणाऱ्या प्रत्येक पक्षाचे काँग्रेस आघाडीत स्वागतच आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबतही चर्चा करण्यास तयार आहाेत. पंरतु, इंडिया आघाडीत येण्यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्ट करताना अकाेला लाेकसभा मतदार संघातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून येइल, असा दावा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी करून ‘वंचित’च्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
वंचित बहुजन आघाडीची अकाेल्यात बुधवारी प्रचंड जंगी सभा झाल्यानंतर पटाेले यांनी शुकवार,२७ ऑक्टाेबर राेजी केलेला अकाेला जिल्हा दाैरा राजकीय वर्तुळात या निमित्ताने चर्चेचा ठरला आहे. माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांच्या इंडियातील प्रवेशावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी तुम्ही आमच्यात मध्यस्थी करा आणि जुळवून द्या, असा प्रतिप्रश्न केला. परंतु, भाजपाविराेधात जे जे आहेत त्यांना इंडिया आघाडीसाेबत घेऊन एकत्र लढणार असल्याची पुस्तीही पटाेले यांनी जाेडली.
शेतकऱ्यांचे प्रश्न जीवन मरणाचे असून, शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अतिवृष्टी, कमी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन मात्र या विषयाकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही, या पार्श्वभूमीवर येत्या नाेव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जिल्हा, तालुुकास्तरावर आंदाेलन केले जाणार असल्याचा माहिती त्यांनी दिली.
नेता कितीही माेठा असला तरी शिस्तीला महत्वकाेणी कुठे उभे राहावे, या क्षुल्लक कारणावरून मागील आठवड्यात प्रदेश पातळीवरील काॅंग्रेसचे अकाेल्यातील दाेन नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले हाेते. एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर यावेळी गंभीर आराेपही केले हाेते. या प्रकरणाची दखल नाना पटाेले यांनी घेतली असून, या प्रकरणात पिस्तूल निघाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण, काेणी कितीही माेठा नेता असला तरी पक्षशिस्तीला महत्व असल्याचे सांगत त्यांनी दाेन्ही नेत्यांना नाेटीस बजावली असल्याचे सांगितले.