वाशिम : जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने दोन्ही पदांसाठी बुधवार, २९ जून रोजी निवडणूक पार पडली. त्यात पुन्हा एकवेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करित मिनीमंत्रालयात हे दोन पक्षच वरचढ असल्याचे दाखवून दिले. बहुतांशी एकतर्फी झालेल्या या निवडणूकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख; तर उपाध्यक्षपदी पुन्हा एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे आरूढ झाले. जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सत्तेची सूत्र आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राकाँच्या स्थानिक नेत्यांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत १७ जागा घेऊन काँग्रेस हा जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन, असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. यंदा मात्र अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने निवडणूकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. काँग्रेसकडे स्वत:चे १७ आणि दोन अपक्ष, असे १९ संख्याबळ होते; तर मित्रपक्ष असलेल्या राकाँकडे आठ सदस्य असल्याने काँग्रेस-राकाँ-अपक्ष आघाडीने जिल्हा परिषदेत पुन्हा एकवेळ आपले निर्भेळ वर्चस्व सिद्ध केले. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख यांच्याविरोधात शिवसेनेच्या मनिषा सानप यांनी अर्ज दाखल केला. त्यात मनिषा सानप यांना २१ मते मिळाली; तर हर्षदा देशमुख यांनी ३0 मते घेत विजयाला गवसणी घातली. दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांच्याविरोधात भाजपाच्या शंकर बोरकर यांनी उमेदवारी दाखल केली. त्यात चंद्रकांत ठाकरे यांनी तब्बल ३२ मते घेत उपाध्यक्षपद काबीज केले; तर शंकर बोरकर यांना केवळ १९ मते मिळाली.
काँग्रेस- राष्ट्रवादीची पुन्हा सरशी!
By admin | Published: June 30, 2016 12:05 AM