अकोला: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले. त्यांच्या काळात निर्माण झालेल्या विविध समस्या व अडचणींवर मात करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने पाच वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले असून, भविष्यातही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आगामी निवडणुका लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले नाही. ही राजकीय यात्रा तर अजिबातच नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान आणि कौल दिला, त्याची जाणीव ठेवत आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो असल्याचे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एरव्ही निवडणुका संपल्या की विजयी किंवा पराभूत उमेदवार फिरकतही नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. शिवसेना याला अपवाद असून, दिलेल्या वचनांची पूर्ती करणारा पक्ष, अशी शिवसेनेची ओळख कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय व्यवस्था, उद्योग-व्यवसायांची पायाभरणी करण्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावयाचा असेल, तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आम्ही सत्तेत असलो तरीही शेतमालाला हमीभाव मिळावा, याकरिता सतत आंदोलने केली. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया कंपन्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वठणीवर आणल्यामुळे कंपन्यांनी १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकºयांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना कायम आग्रही आहे आणि राहील. वचन देतो की सरसकट कर्जमुक्तीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप, विधानसभा संपर्क प्रमुख महादेवराव गवळे व सेवकराम ताथोड उपस्थित होते.