अकोला: मोदी लाट संपली, या भ्रमात लोकसभा निवडणूक लढवून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने आता पराभवापासून धडा घेत पक्ष संघटनेत नव्याने चैतन्य निर्माण करण्याची रणनीती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्यासाठी हिदायत पटेल यांच्या रूपाने मुस्लीम उमेदवार देण्याची खेळी काँग्रेसने खेळली होती. या उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांचे मताधिक्य कमी होऊन ते तिसºया क्रमांकावर जातील, असा होरा काँग्रेस नेत्यांचा होता. प्रत्यक्षात मात्र आंबेडकरांनी आपले मताधिक्य वाढवित दुसºया क्रमांकावर झेप घेत काँग्रेसला मागे ढकलले. काँग्रेसच्या हातातून परंपरागत मतेही निसटल्याचे निकालाची आकडेवारी स्पष्ट करते.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असून, पक्ष संघटना कमकुवत ठरत असल्याचा निष्कर्ष यानिमित्ताने काढल्या जात आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी आता दोन्ही काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हिदायत पटेल व महानगर काँगे्रसचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांची त्या-त्या पदावर फेरनिवड करण्यात आली होती. पटेल हे लागोपाठ दुसºया निवडणुकीत पराभूत झाले असून, चौधरी यांच्या विरोधातही नाराजीचा सूर जाहीरपणे प्रकट झाला होता. राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संग्राम गावंडे यांची निवड करण्यात आली आहे तर महानगर अध्यक्षपदी प्रभारी असलेल्या राजू मुलचंदाणी यांना पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली; मात्र लोकसभा निवडणुकीआधी रफीक सिद्दीकी यांना कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. राष्टÑवादी काँग्रेसमध्येही गटबाजी तीव्र असून, लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या बैठका घेण्याची वेळ पक्षावर आली होती, तर एका गटाने नाहक कटकट नको, या उद्देशातून पक्षाच्या होर्डिंग-बॅनरवर एकमेकांचे छायाचित्र न छापण्याची भूमिका घेतली. कार्यक्रमाचा जो आयोजक असेल, त्याने त्यांच्यापुरते छायाचित्र छापावेत, असा अलिखित नियम घालून घेतल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शनिवारी मुंबईत झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीनंतर संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई येथे ७ व ८ जून रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना प्रामुख्याने बोलाविण्यात आले असून, पक्ष संघटना हाच मुद्दा ऐरणीवर राहणार असल्याची माहिती आहे.