अकोला: आरक्षण दिले तरच तुम्ही सत्तेत राहणार, असा इशारा देत मराठा समाजाने शासनाला झुकविले. १६ टक्के मराठा समाजाला शासन घाबरते. मुस्लीम १९ टक्के असूनही शासन घाबरत नाही. मुस्लिमांनी स्वत:ची ताकद ओळखावी. काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांचा वापर केला. काँग्रेसने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला; परंतु मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसला मुस्लिमांची मते पाहिजेत; परंतु मुस्लीम नेते काँग्रेसला चालत नाहीत, असा घणाघाती हल्ला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चढविला.भारिप-बमसं व एमआयएमच्यावतीने मुस्लीम आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.अॅड. आंबेडकर म्हणाले की, मुस्लीम आरक्षणासाठी पहिल्या राजकीय आंदोलनाची ही सुरुवात आहे. मुस्लिमांविरुद्ध प्रचार करणे हा भाजपचा अजेंडा आहे. सर्वच राज्यांमध्ये भाजपने मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकली. काँग्रेस व भाजप अजेंडा सारखाच असल्याचा आरोप करीत त्यांनी, काँग्रेसने मुस्लिमांना स्वीकारण्यासाठी एमआयएमला स्वीकारायला हवे; परंतु काँग्रेस ते करायला तयार नाही. बहुजन समाज आणि मुस्लिमांच्या समस्या सारख्याच आहेत. ७0 वर्षांमध्ये बहुजन समाजाचा एकही प्रतिनिधी संसदेत जाऊ शकला नाही. बहुजन व मुस्लीम समाजाला संसदेत प्रतिनिधीत्व मिळावे, असे सांगत, अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेसला १२ जागा मागितल्या; परंतु काँग्रेस एक जागा द्यायला तयार आहे. आम्हाला काँग्रेसची एक जागा नको. लोकसभेत जाईल तर बहुजन, मुस्लिमांना सोबत घेऊन जाईल, अन्यथा नाही, अशी भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. मुस्लीम समाजाला आता भाजपला घाबरण्याची गरज नाही. भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. मुस्लीम समाजाने ताकद दाखविल्याशिवाय मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आमदार हरिदास भदे, भारिपचे प्रदेश महासचिव युसूफ पुंजानी, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, डॉ. रहमान खान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्ला खाँ पठाण, एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद मुस्तफा, एमआयएम अकोट तालुकाध्यक्ष अब्दुल सादिक इनामदार, शेख साबीर शेख मुसा, इरफान अली मीरसाहेब, सय्यद मोहसिन, अन्सार खाँ अताउल्ला खाँ, राजेंद्र पातोडे, भारिपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, पुष्पा इंगळे, प्रा. मंतोष मोहोड, काशिराम साबळे आदींसह शेकडो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
मोर्चातील मागण्याशैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लीम समाजाला आरक्षण त्वरित लागू करावे, सच्चर कमिटीचा अहवाल लागू करावा, मुस्लिमांना आरक्षण लागू केल्याशिवाय नोकरभरती करू नये, मुस्लीमबहुल भागांमध्ये विकास योजना राबवा आणि मुस्लीम शरीअतमध्ये हस्तक्षेप करू नका, मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.