अकोला: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या व पक्षात स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणाºया काँग्रेसच्या काही इच्छुक पदाधिकाऱ्यांनी अकोला पश्चिम मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचे समजून तिकिटासाठी चक्क राष्ट्रवादीकडे जोरदार ‘लॉबिंग’ सुरू केली आहे. यासाठी मुंबईत तळ ठोकून बसणाºया इच्छुकांनी मागील पाच दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बड्या व वजनदार नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून, पक्षाच्या नगरसेवकांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.राजकीय क्षेत्रात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, याची प्रचिती काँग्रेसच्या निष्ठावान पदाधिकाºयांमार्फत सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ. यात दुमत नाही. मागील २५ वर्षांपासून या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार गोवर्धन शर्मा सलग विजयी होत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेससाठी नेहमीच अनुकूल मानण्यात आला आहे. आ. गोवर्धन शर्मा सतत निवडून येत असले तरी या मतदार संघातील मुस्लीम समाज सदैव काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे निकालाअंती समोर आले आहे. अर्थात काँग्रेसच्या पारड्यात त्यांची परंपरागत मते मिळत असली तरी दुसरीकडे भारिप-बहुजन महासंघाने काँग्रेसच्या समीकरणांमध्ये वजाबाकी करणार असल्याचे दिसून येते. यंदाही अॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याने त्यांच्या राजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धामधुमीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुक पदाधिकाºयांनी त्यांची पक्षनिष्ठा बाजूला सारत उमेदवारी मिळावी, याकरिता चक्क राष्ट्रवादीतील ‘साहेबां’कडे ‘लॉबिंग’सुुरू केल्याची माहिती आहे.मुंबईत ठोकला तळदिल्ली दरबारी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचे पाहून तसेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला जाणार असल्याचे समजताच काँग्रेसमधील इच्छुकांनी पक्ष सोडण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला आहे. दरम्यान, काँग्रेसमधील इच्छुकांची तयारी पाहून राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या पोटात गोळा उठला आहे. पक्षाने योग्य निर्णय घेऊन आयाराम-गयारामांना संधी देऊ नये, असा रेटा पक्षाकडून लावून धरला जाणार असल्याची माहिती आहे.
नगरसेवकांची मनधरणी सुरूमागील अनेक वर्षांपासून पक्षाने दिलेली जबाबदारी इमानइतबारे पार पाडली. आता ऐन विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अदलाबदल होणार असल्याने आपसूकच दावेदारी डावलल्या जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिकिटावर का असेना, ही निवडणूक लढू द्या, त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगत इच्छुक पदाधिकारी काँग्रेसच्या नगरसेवकांची मनधरणी करीत असल्याची माहिती आहे.