अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसनेअकोला लोकसभा मतदारसंघासाठी संसदीय बोर्डाची स्थापना केली असून, त्याची पहिली बैठक येत्या आठवडयात होणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार असून, पक्षाकडे २० उमेदवारांनी अधिकृतरीत्या उमेदवारी मागितली आहे.अकोला लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हा संसदीय बोर्डाचे गठन करण्यात आले आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाºया उमेदवारांना १२ जानेवारी ते १५ जानेवारी यादरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये सह अध्यक्ष पदावर बबनराव चौधरी तसेच वाशिमचे शहराध्यक्ष दिलीप सरनाईक यांचा समावेश असून, प्रभारी पदावर गिरीश पांडव व वाशिमचे प्रकाश साबळे यांची निवड केली असून, माजी मंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार यांच्यासह विविध सेलच्या एकूण ३९ पदाधिकाºयांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व पदाधिकारी आलेल्या अर्जावरून उमेदवारांच्या क्षमतेसंदर्भात चर्चा करणार असून, तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविणार आहे. संसदीय मंडळाची बैठक १६ जानेवारी रोजी अपेक्षीत होती मात्र ही बैठक आता या आठवडयात होण्याची शक्यता काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख कपील रावदेव यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केली.
मराठा कार्डवर जोरलोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घोषित केली असून, जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चांची फेरी आटोपली असून, केवळ आठ जागांचा तिढा कायम आहे. या आठ जागांमध्ये अकोल्याचा समावेश नसल्यामुळे अकोल्याची जागा काँग्रेसच्या उमेदवारासाठी सोडण्यात येणार असल्याने काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी मराठा कार्ड खेळण्यावरच भर दिल्याचे दिसत आहे. १५ जानेवारी पर्यंत डॉ.सुभाष कोरपे, डॉ.अभय पाटील, डॉ.अरूण भागवत,डॉ.पुरूषोत्तम दातकर, डॉ. संजीवनी बिहाडे, शोयब अली मिरसाहेब, अजाबराव टाले, कमरूद्दीन आदींचा समावेश आहे. दरम्यान भारिप-बमसं सोबत आघाडीचा प्रश्न जवळपास संपल्या सारखा असून इच्छुक उमेदवारांपैकी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षात दाखल झालेले डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.