- राजेश शेगोकार अकोला : लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. ती साथ मिळाली असती, तर १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आघाडीला मिळालेले यश कदाचित पुन्हा एकदा मिळविता आले असते; मात्र आता अॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे. अॅड. आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक ठरते, असा आरोप काँगे्रसच्या गोटातून नेहमीच होता. त्या आरोपाला उत्तर देताना अॅड. आंबेडकरांनी ‘काँग्रेसला मोठे करणे ही माझी जबाबदारी नाही’ असे अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.वसंतराव साठे यांच्यासारख्या आयात उमेदवारालाही दोन वेळा खासदार करणारा अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी असे म्हणण्याचे कारण म्हणजे, याच मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेसाठी प्रभावी ‘चेहरा’ सापडणेही कठीण झाले आहे. स्व. नानासाहेब वैराळे हे १९८४ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे खासदार, त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. १९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन भाजपाला सहा वर्षांची विश्रांती देण्यात यश आले; मात्र अॅड. आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच, हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाने ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध करून काँग्रेसच्या ‘हाता’तून एक-एक सत्ताकेंद्र हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.या सर्व पृष्ठभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अॅड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन काँग्रेस भाजपाच्या विजयी रथाला थांबवायचे मनसुबे आखत होते; मात्र आता अॅड. आंबेडकरांनीच ‘एमआयएम’सोबत आघाडी केल्याने काँग्रेसपुढे उमेदवार निवडीचेच आव्हान आहे.