महापालिकेत महाशिवआघाडीच्या गठनावर काँग्रेस-सेनेचा सावध पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:16 PM2019-11-20T14:16:58+5:302019-11-20T14:17:25+5:30
महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत महाशिवआघाडीचे गठन होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर सद्यस्थितीत शिवसेनेचा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षासोबत घरोबा वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी या तीनही पक्षांकडून महाशिवआघाडीचे गठन होणार असल्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत महाशिवआघाडीचे गठन होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व भारिप-बमसंच्या गटनेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपाने महायुती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणे पसंत केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेत जागा वाटपाच्या मुद्यावर शिवसेना-भाजपमध्ये बिनसल्याचे समोर आले. भाजपाशी काडीमोड घेतलेल्या सेना नेतृत्वाने सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाशिवआघाडीचे गठन करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. २२ नोव्हेंबर रोजी महापौर पदाची निवडणूक होणार असून, भाजप उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मनपात भाजपचे ४८ नगरसेवक असून, उर्वरित ३२ नगरसेवकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप-बमसं, एमआयएम तसेच अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय मानला जात असला तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, या उद्देशातून काँग्रेसने बाह्या वर खोचल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या राजकारणात महाशिवआघाडीचे गठन होणार का, याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेत महाशिवआघाडी करायची किंवा नाही, यासंदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर चाचपणी करीत आहोत. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहील. गुरुवारपर्यंत आघाडीच्या मुद्यावर चित्र स्पष्ट होईल. महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे नक्की.
-साजीद खान पठाण, गटनेता काँग्रेस, मनपा.
मनपात महापौर-उपमहापौर निवडीसाठी महाशिवआघाडीचे गठन करायचे किंवा नाही, याविषयी पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांचा निर्णय येणे बाकी आहे. पक्षादेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. भविष्यात मनपाच्या राजकारणात विरोधाची धार अधिक तीव्र होईल, यात शंका नाही.
-राजेश मिश्रा, गटनेता शिवसेना, मनपा.
महापालिकेच्या राजकारणात महाशिवआघाडीत सामील व्हायचे किंवा नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.
-अॅड. धनश्री देव, गटनेता भारिप-बमसं, मनपा.