लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ‘मराठा कार्ड’ खेळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:35 PM2019-01-12T12:35:44+5:302019-01-12T12:42:05+5:30
अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा कार्डच्या माध्यमातून व्यूहरचना आखली जात आहे.
- आशिष गावंडे
अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा कार्डच्या माध्यमातून व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने काँग्रेसमध्ये अभय पाटील व प्रशांत गावंडे यांच्या नावावर खलबते सुरू असून, शिवसेनेमध्ये माजी आ. गजानन दाळू गुरुजी व विजय मालोकार यांचा विचार सुरू आहे. शिवसेनेत विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याही नावावर विचार केला जात आहे, तर काँग्रेस मनपातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या नावावरही विचार करीत आहे.
लोकसभेच्या अकोला मतदारसंघात १९९८ व १९९९ मधील निवडणुकीत भारिप-बमसंचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते. तो कालावधी वगळल्यास १९८९ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून येते. भाजपाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर खासदार संजय धोत्रे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये आघाडीवर अद्याप एकमत झाले नसल्याने काँग्रेसच्या गोटात संभाव्य उमेदवारांच्या नावावर खलबते सुरू आहेत. खा. संजय धोत्रे यांना कडवी झुुंज देण्याच्या उद्देशातून काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे यांच्या नावावर चर्चा होत आहे. यासोबतच मनपातील विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांचेही नाव चर्चिल्या जात आहे.
...तर शिवसेना-भाजप आमनेसामने!
शिवसेना-भाजपमध्ये युती न झाल्यास, अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप व सेनेचा आमना-सामना पाहावयास मिळेल. शिवसेनेकडूनसुद्धा मराठा कार्डचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माजी आ. गजानन दाळू गुरुजी, विजय मालोकार यांच्या नावाचा समावेश आहे; मात्र ऐन वेळेवर विधान परिषद निवडणुकीत सलग तीन वेळा विजयी झालेले आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावरही जबाबदारी येऊ शकते. त्यासाठी तयार राहण्याची सूचना त्यांना पक्षाने दिल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या उमेदवारावर धाबा गावात मंथन
शहरात ७ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमीत्त पक्षात पडद्याआड अनेक हालचाली झाल्या. ८ डिसेंबर रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावात लोकसभेच्या संभाव्य उमेदवारावर मंथन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसमधील निवडक ज्येष्ठ नेते, युवा नेत्यांची उपस्थिती होती.
२०१४ मध्ये भाजपाचा एकतर्फी विजय
एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे अॅड. संजय धोत्रे यांना ४ लक्ष ५६ हजार ४७२ मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लक्ष ५३ हजार ३५६ मते तसेच भारिप-बमसंचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लक्ष ३८ हजार ७७६ मते मिळाली होती. यंदा काँग्रेस व शिवसेनेने निवडणुकीत मराठा उमेदवार उभा केल्यास चुरस पाहावयास मिळेल.