पिंजर परिसरातील वीज पुररवठा वारंवार खंडित होत आहे. येथे कोणी जबाबदार अधिकारी नसल्याने पिंजर व परिसरातील वीज बिल वसुली थांबली आहे. लोकांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नसल्याने ग्राहक बिल भरण्यास तयार नाहीत. मोझरी, पारडी येथील वीज पुरवठा वारंवार बंद राहतो. लोकांना अंधारात राहावं लागते. येथे पठाण नामक लाइनमन असून ते वीज पुरवठा सुरळीत ठेवत नसल्याचा आरोप लोकांनी केला आहे. कृषिपंपांनासुद्धा वीज पुरवठा मिळत नसल्याची ओरड आहे.
प्रभारी अभियंत्यांचे दुर्लक्ष
पिंजर परिसराची जबाबदारी प्रभारी कनिष्ठ अभियंता मंगेश राणे यांच्याकडे आहे; परंतु राणे हे पिंजरला येत नाहीत. बार्शीटाकळीत राहतात. बार्शीटाकळी येथूनच ते काम पाहतात. अभियंता राणे यांनी मान्सूनपूर्व कामे करणे अपेक्षित होते; परंतु त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वीज पुरवठा सातत्याने खंडित होताे. लाइनमनला सांगितले तर ते लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सामान्य जनतेने समस्या मांडाव्या तरी कुठे?
- गजानन पाटील काकड, सरपंच मोझरी-पारडी