अकोला: जिल्हयातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सरकारी जमीनींवर (इ क्लास ) क्रीडांगण तयार करण्याची सूचना जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गुरुवारी सदस्यांनी मांडली. त्यानुषंगाने कार्यवाही सुरु करण्याचेही सभेत ठरविण्यात आले.
ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी जाणीव जागृतीसह उत्सुकतेची भावना वाढीस लागावी, यासाठी गावांत उपलब्ध ‘इ क्लास ’ जमीनींवर विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण तयार करण्यात यावे. संबंधित इ क्लास जमीनीचा सातबारा जिल्हा परिषद शाळेच्या नावाने करण्यात यावा, अशी सूचना राम गव्हाणकर यांनी सभेत मांडली. त्यानुषंगाने यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सभेत ठरविण्यात आले.
यासोबतच जिल्हयातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थींच्या अडचणी सोडविण्याच्या सोडविण्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षक नाही, अशा ठिकाणी तातडीने महिला शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणीही गव्हाणकर यांनी सभेत केली. अकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत घेण्यात आलेल्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या समस्या आणि अडचणींच्या मुद्दयावरही चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण सभापती माया नाइक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी, समितीचे सदस्य राम गव्हाणकर, स्फूर्ती गावंडे, वर्षा वझिरे, प्रगती दांदळे, गजानन काकड, डाॅ.गणेश बोबडे, प्रमोद फाळके, शिक्षणाधिकारी डाॅ.सुचिता पाटेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शाळेत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी शिक्षण सभापतींनी दिली मानधनाची रक्कमअकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत बोअरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र या बोअरचे सबमर्सिबल पंप जळाले शाळेतील पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे नवीन सबमर्सिबल पंप बसवून शाळेतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण सभापती माया नाइक यांनी मानधनातून १३ हजार ५५ रुपयांची रक्कम शाळेला दिली. या रकमेचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या उपस्थितीत शिक्षण समितीच्या सभेत जि.प. सावित्रीबाइ फुले कन्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना देण्यात आला.