तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा मार्गावरील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे शेत रस्त्यावरील रपटा तुटल्याने शेतकऱ्यांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले असून, रस्ता बंद झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास माहिती देऊन रस्त्याची दुरुस्ती करून रपटा बसविण्याची मागणी केली; मात्र याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
तळेगाव-पातुर्डा मार्गावरील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्याने गावातून शेताकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावरील रपटा फुटल्याने या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. या मार्गाने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास माहिती देऊन रपटा बसविण्याची मागणी केली; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती जैसे थे आहे. या मार्गाने नेहमीच वर्दळ असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारणा केली असता, ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करून रपटा बसविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
------------------------------
शेती करणे झाले कठीण
सद्य:स्थितीत खरीप हंगामाची पेरणी आटोपली असून, शेतीअंतर्गत मशागतीला वेग आला आहे. या मार्गाने गावातील जवळास १० शेतकऱ्यांची ४० ते ५० एकर शेती आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे कामे थांबली आहेत. शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
------------------