लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: इमारतींचे बांधकाम करताना थेट रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मालमत्ताधारकांना महापौर विजय अग्रवाल तसेच महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बांधकाम साहित्य हटविण्याचा गर्भित इशारा दिला होता. यासंदर्भात महापौर अग्रवाल यांनी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ तसेच आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. महापौरांसह आयुक्तांच्या निर्देशाला संबंधित अधिकाºयांनी केराची टोपली दाखविली असून, आजपर्यंत ना बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले ना दंड बजावण्यात आला.शहराच्या कानाकोपºयात विविध इमारतींचे बांधकाम जोरात सुरू आहे. बांधकाम करताना संबंधित मालमत्ताधारकांकडून विटा, रेती, गिट्टी, लोखंड तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी थेट रस्ते किंवा सार्वजनिक जागेचा वापर केला जात आहे. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खासगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम करणाºयांनी चक्क रस्त्यांचा वापर सुरू केला आहे.त्यामुळे संबंधित परिसरातून वाहतूक करणाºया वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित मालमत्ताधारकाला हटकल्यास किंवा सूचना केल्यास त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पाहून रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हा प्रकार लक्षात घेता प्रशासनाने रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारकांना दंड बजावण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.
‘अल्टीमेटम’ विरला हवेतकमर्शियल कॉम्प्लेक्स असो वा रहिवासी इमारती किंवा घरांचे बांधकाम साहित्य रस्त्यावर असेल तर तातडीने हटविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. साहित्य न हटविल्यास ते जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. प्रशासनाच्या ‘अल्टीमेटम’ला बांधकाम करणाºयांनी केराची टोपली दाखविली आहे.