खेट्री : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथे समाजमंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कंत्राटदाराचे देयक अदा करू नये, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेमार्फत सावरगाव येथे १० लाखांचे समाज सभागृह मंजूर करण्यात आले. या समाजमंदिराचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. या बांधकामामध्ये रेतीचा वापर करण्याऐवजी चुरीचा वापर करण्यात आला असून, बोगस वीट व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच बांधकामादरम्यान अद्यापही पाण्याचा वापर करण्यात आलेला नाही. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. बांधकाम सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधकाम अभियंत्याची अनेक वेळा भेट आवश्यक असते; परंतु संबंधित अभियंत्याची भेट हे कागदावरच दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या निधीला चुना लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे बांधकामाची पाहणी करून कारवाईची मागणी होत आहे. याबाबत संबंधित अभियंत्याशी वारंवार संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
------------------------
सभागृहाच्या बांधकामामध्ये पाण्याचा वापर कमी करण्यात आला असून, बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत कंत्राटदाराला वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे काम असल्यास देयक काढण्यात येणार नाही.
- गजानन शंकर बलब, सरपंच, सावरगाव
--------------------
लाखो रुपये खर्च करूनही सभागृहाचे बांधकाम जीर्णावस्थेत करण्यात आले आहे. तसेच बांधकामामध्ये पाण्याचा वापर न करता रेतीऐवजी चुरीचा वापर व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याने काही महिन्यांतच बांधकाम जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गोपाल राठोड, ग्रामस्थ, सावरगाव