- अतुल जयस्वाल अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.पोलिओ निर्मूलन करण्यासाठी शून्य ते ५ वयोगटातील बालकांना इंजेक्शन व तोंडावाटे अशा दोन प्रकारे लसीकरण केले जाते. खासगी कंपन्यांकडून शासनाला लसीचा पुरवठा केला जातो. गाझियाबाद येथील बायोमेड प्रा. लि. या कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ हा पोलिओ व्हायरस आढळून आल्यानंतर केंद्र शासनाने १० सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात ११ सप्टेंबरपासून या लसींचा वापर पूर्णपणे थांबविण्यात आला. अकोला आरोग्य सेवा मंडळाला १८ आॅगस्ट रोजी गाझियाबाद येथील बायोमेड प्रा. लि. या कंपनीने तयार केलेल्या लसीचे १ लाख ४७ हजार डोज प्राप्त झाले होते. यापैकी अकोला येथील मुख्यालयातून यवतमाळ जिल्ह्याला १५ हजार डोज, तर वाशिम जिल्ह्यासाठी २१ हजार ५०० डोज पाठविण्यात आले. लसींचा वापर थांबविण्याचा आदेश येण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमधून बालकांना ७,७०० डोज पाजण्यात आले, तर यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार ५८० डोज बालकांना पाजण्यात आले. वापर थांबविण्याचा आदेश आल्यानंतर वाशिम जिल्ह्यात १३ हजार ८०० डोज, तर यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ४२० डोज सिल करण्यात आले. दोन्ही जिल्हे मिळून १९ हजार २८० डोज पाजण्यात आले. एकून १७ हजार २२० डोज सिल करण्यात आले आहेत.अकोला, बुलडाणा, अमरावतीमध्ये दुसऱ्या कंपनीची लसया काळात आरोग्य सेवा मंडळातील अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला; परंतु या लस दुसºया कंपनीच्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात गाझियाबाद येथील कंपनीच्या लसीचे डोस वितरित करण्यात आले. ही लस बालकांना पाजण्यात आली असली, तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण यामध्ये क्षीण व्हायरस असतात. त्यापासून काहीही अपाय उद्भवत नाही.
- डॉ. आर. एस. फारुखी, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला.