बाळापूर : नगर परिषदेमार्फत अकोला नाका परिसरात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो; मात्र मुख्य मार्गावरील जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे अकोला नाका परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी नगर परिषद व ग्रामपंचायतीला वारंवार मागणी करूनही संबंधिताच्या दुर्लक्षतेमुळे परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अकोला नाका परिसराचा भाग शेळद ग्रामपंचायती अंतर्गत येतो. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेंतर्गत अकोला नाका परिसरातील काही नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तर नगर परिषद ही बाळापूरच्या हद्दीबाहेरील नागरिकांना शहरातील नागरिकांपेक्षा दुपटीने पाणी कर वसूल करूनही नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. नगर परिषद व ग्रामपंचायत शेळदची जलवाहिन्या व पाणी सोडणारे व्हॉल्व्ह नजीक असल्याने फुटलेली आहे. तसेच परिसरात कचऱ्याचा मोठा ढीग असून, सांडपाणी वाहते. हे सांडपाणी फुटलेल्या जलवाहिनीत जात असल्याने अकोला नाका परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगर परिषद व ग्रामपंचायत दोन्ही प्रशासन जबाबदारी विसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.