अकोला: कोरोना काळात सर्वत्र कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण पसरले असून, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच , मरणाच्या भयातही अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वाॅर्डांमध्ये साफसफाईसह रुग्णसेवा करीत, कोरोनाबाधित रुग्णांना आधार देण्याचे काम कंत्राटी कामगारांकडून करण्यात येत आहे.
जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना काळात सद्यस्थिीतीत सर्वत्र कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतू कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या भयातही जीवाची पर्वा न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वार्डांमध्ये २१५ कंत्राटी कामगार साफसफाईच्या कामासह कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याचे काम करीत आहेत. त्यामध्ये पुरुष व महिला कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराच्या प्रक्रियेत डाॅक्टरांच्या मार्गदर्शनात कंत्राटी कामगार रुग्णांच्या उपचारासाठी सहकार्य करीत, कोरोनाबाधित रुग्णांना आधार देण्याचे काम करीत आहेत.
कोरोना योध्दा कंत्राटी कामगार
अशी करतात रुग्णसेवा!
कोरोना काळात डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच कोविड वाॅर्डांमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार कोरोना योध्दा ठरत आहेत. कंत्राटी कामगार कोविड वाॅर्डांमध्ये साफसफाई , स्वचछतागृहांची सफाई, उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना भोजन देणे, त्यांना घास भरविणे, रुग्णांना तपासणीसाठी नेणे, रुग्णांचा नातेवाइकांसोबत व्हीडीओ काॅलव्दारे संवाद करण्यासाठी मदत करणे, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास मृतदेह शितगृहापर्यत नेणे इत्यादी प्रकारच्या रुग्णसेवेचे काम कंत्राटी कामगार करीत आहेत.
रुग्णांशी जुळते भावनिक नाते!
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांत मदतीचे काम करताना कंत्राटी कामगारांचे अनेक रुग्णांसोबत भावनिक नाते जुळले जाते. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना डिस्जार्ज दिल्यानंतर संबंधित रुग्णांसोबत संपर्क साधून कंत्राटी कामगारांकडून रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली जाते.
प्रती दिवस ४०० रुपये
मानधनावर करतात काम!
कोरोना काळात कोविड वाॅर्डांमध्ये रुग्णांवर उपचारात मदतीचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगार प्रत्येकी प्रती दिवस ४०० रुपये प्रमाणे मानधनावर काम करतात. मात्र हे मानधनही कंत्राटी कामगारांना वेळेवर मिळत नाही.
विम्याचे कवच अन् सेवेत
नियमित करण्याची अपेक्षा!
कोरोना काळात शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वाॅर्डात साफसफाई आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांत मदतीची विविध कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांना शासनाने विमा कवच आणि शासकीय सेवेत नियमित करण्याची अपेक्षा कंत्राटी कामगारांकडून केली जात आहे.
वैद्यकीय महािवद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वाॅर्डांमध्ये कंत्राटी कामगार साफसफाई आणि कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारात मदतीचे काम करतात. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना शासनाने अत्यावश्यक सुविधांसह विमा कवच दिले पाहिजे. तेसच त्यांना सेवेत नियमित करण्याची गरज आहे.
पराग गवई
सदस्य, रुग्ण कल्याण समिती.