अकोला : शासनामार्फत राबविण्यात येणार्या सामाजिक न्यायाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितरीत्या काम करणे आवश्यक आहे, त्याकरिता प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी केले. रार्जषि शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह येथे आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.एम.चव्हाण, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, समाजकल्याण अधिकारी माया केदार, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य डॉ.विजय दुतोंडे, शेख जावेद मुन्नवर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमात इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रार्जषि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच कन्यादान योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.एम.चव्हाण यांनी केले. संचालन प्रकाश अंधारे यांनी तर आभारप्रदर्शन माया केदार यांनी केले.
सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी योगदान द्या!
By admin | Published: June 27, 2014 1:25 AM