लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शाळा, महाविद्यालयीन तरुणींची छेडखानी करणाऱ्या चिडीमारांना ऊत आला असून, जुने शहरात मुलीच्या छेडखानीवरून दोन समुदायात असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी महाविद्यालयीन तरुणीच्यावतीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची गर्दी वाढताच टवाळखोर चिडीमारांना ऊत आल्याचे चित्र आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवून मुलींना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. चौका-चौकांमध्ये टोळक्याने उभे राहून मुलींना हातवारे करणे, त्यांचा पाठलाग करणे किंवा भररस्त्यात अडविण्याच्या प्रकारामुळे शाळकरी मुली, तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जुने शहरात भिरड पेट्रोलपंपानजीक उभ्या राहणाऱ्या चिडीमारांनी महाविद्यालयीन तरुणीची छेड काढली. ही माहिती कुटुंबातील सदस्यांना मिळताच त्यांनी चिडीमारांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसात धाव घेतली. हा विषय आपसात घेण्यासाठी दोन भिन्न समुदायातील प्रतिष्ठित नागरिकांनी प्रयत्न केले असले तरी या भागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती आहे. डाबकी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांनी दोन्ही चिडीमारांची धुलाई केली असली तरी चिडीमारांवर अंकुश ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दामिनी पथक आहे कोठे?चिडीमार तसेच रस्त्यालगत गप्पा ठोकणाऱ्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दामिनी पथकाचे गठन करण्यात आले आहे. डाबकी रोड परिसरातील खंडेवाल महाविद्यालय, गोडबोले उद्यान, गणेश नगर, चिंतामणी नगर परिसरात रोडरोमियोंनी उच्छाद मांडला आहे. भर रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या रोमियोंमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, दामिनी पथक आहे कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. तरुणीची छेडखानी करणाऱ्या युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्या भागात रोडरोमियो, चिडीमारांचा त्रास असेल त्या परिसरातील नागरिकांनी आम्हाला भ्रमणध्वनीद्वारे सूचना केल्यास निश्चित कारवाई केली जाईल. मोक्याच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. - सुनील सोळंके, पोलीस निरीक्षक
अकोल्यात मुलीच्या छेडखानीवरून वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:20 AM