राम देशपांडे/ ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 3 - दादर्यावर चढून जाण्यासाठी असलेल्या जिन्याच्या आडोशाला गोळा केलेल्या काडीकचर्याच्या आधारे चक्क चुलीवर स्वयंपाक सुरू असल्याचे धक्कादायक चित्र सोमवारी सायंकाळी अकोला रेल्वे स्थानकावर दिसून आले. ज्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता, त्या सभोवताली अनेक दुचाक्या अनधिकृतरित्या उभ्या आल्या असल्याने ही बाब रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेला आव्हान देणारी ठरत आहे. तर रेल्वे प्रशासनाच्यावतीने राबविल्या जाणार्या स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
अकोला रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात कायम भिक्षेकर्यांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनालाच नव्हे, तर रेल्वे पोलीसांना देखील न जुमानणार्या या भिक्षेकर्यांमुळे येणार्या जाणार्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वारंवार हुसकावल्यानंतरसुद्धा परिसरात ठाण मांडून घाण करणार्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अक्षरश: नाकी नऊ आणले आहेत. फलाटांवर जाण्यासाठी असलेल्या दोनपैकी एका दादर्याखाली चक्क चुलवर स्वयंपाक सुरू असल्याचे चित्र सोमवारी सायंकाळी दिसून आले. गोळा केलेल्या काडीकचरा पेटवून त्यावर पोळय़ा शेकल्या जात होत्या. धक्कादायक बाब अशी की, ज्या दादर्याच्या आडोशाला हा प्रकार सुरू होता, त्या सभोवताली ३0 पेक्षाही अधिक दुचाक्या अनधिकृतरित्या उभ्या करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेला आव्हान देणारी ही बाब एवढय़ावरच संपुष्टात येत नाही. तर, कायम रेल्वे स्थानकाच्या आश्रयाला असलेली ही मंडळी थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क शेकोट्या पेटविल्या जात आहे. डोळादेखत सुरू असलेल्या या प्रकारावर आळा घालण्यास रेल्वे पोलीस असर्मथ ठरत असून, स्थानिक रेल्वे प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी राबविल्या जाणार्या ‘स्वच्छ भारत अभियान’चा याठिकाणी फज्जा उडला असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुचाकी गाड्या उभ्या करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एवढी मोठी पार्किंगची व्यवस्था केली असताना, दादर्याखाली दुचाक्या उभ्या करणारे कुणाचे खिसे भरत आहेत हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.