रतनलाल चाैकात नाल्या तुंबल्या!
अकाेला : रतनलाल प्लाॅट चाैकातील मुख्य नाल्यांची मागील महिनाभरापासून साफसफाई झाली नसल्यामुळे परिसरातील नाल्या तुंबल्याचे चित्र आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक, मनपाचे आराेग्य निरीक्षक या भागात फिरकत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
उपाहारगृहांसमाेरील वाहने वाहतुकीला अडथळा
अकाेला : मुख्य पाेस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चाैक, रेल्वे स्टेशन चाैक, जठारपेठ चाैक ते रतनलाल प्लाॅट चाैक आदी मुख्य रस्त्यावर असलेल्या उपाहारगृहांसमाेर खवैय्यांची चांगलीच गर्दी हाेत आहे. त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे रहदारीला अडथळा हाेत आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी हाेत आहे.
सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करा
अकाेला : शहराच्या विविध भागात माेठा गाजावाजा करून सिमेंटकॉंक्रीटचे रस्ते निर्माण केले जात आहेत. यातील बहुतांश कामे अर्धवट स्थितीत असून, यामुळे वाहनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दुर्गा चाैक आदी रस्त्यांचा समावेश आहे.
जलवाहिनीसाठी खाेदले रस्ते
अकाेला : शहराच्या विविध भागात नव्याने जलवाहिनी टाकली जात असून, यासाठी मुख्य रस्त्यांसह प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची ताेडफाेड हाेत आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना दुरुस्तीकडे पाठ फिरवण्यात आल्यामुळे अकाेलेकरांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
धुळीमुळे श्वसनाच्या विकारात वाढ
अकाेला : शहरात रस्त्यांची कामे माेठ्या प्रमाणात सुरू असून, खाेदलेल्या रस्त्यांमुळे अकाेलेकरांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. हिवाळ्यात धुळीचा त्रास वाढल्याने लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांमध्ये श्वसनाच्या विकारात वाढ झाल्याचे दिसत आहे. मनपाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
बाेंडअळीचा उद्रेक; शेतकरी हतबल
अकाेला: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना साेयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान सहन करावे लागले. झालेले नुकसान कापसाच्या उत्पादनात भरून निघेल अशी अपेक्षा असताना कापूस पिकावर बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाला असूनल, शेतकरी हतबल झाला आहे.
खुलेआम मांस विक्री
अकाेला : महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागात थेट रस्त्यालगत उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. आराेग्य विभागाच्या निकषानुसार मांस विक्रेत्यांना उघड्यावर व्यवसाय करता येत नाही. याप्रकरणी मनपाच्या आराेग्य व अतिक्रमण विभागाने धडक कारवाई राबविण्याची मागणी हाेत आहे.
जठारपेठ चाैकात वाहतुकीची काेंडी
अकाेला : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जठारपेठ चाैकात भाजी व फळ व्यावसायिकांनी चक्क रस्त्यावरच बाजार थाटला आहे. यामुळे चाैकात वाहतुकीची चांगलीच काेंडी हाेत असून, सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. प्रभागातील नगरसेवक व मनपाला कर्तव्याचा विसर पडल्याने नागरिकांमध्ये राेष आहे.
शहरात साफसफाईचा फज्जा
अकाेला : मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे स्वच्छता व आराेग्य विभागाकडे दुर्लक्ष हाेत असून, चारही क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या जात असल्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भाेगावे लागत आहेत. शहरात साफसफाईचा फज्जा उडाला असून, नाल्या, गटारे, मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागांमध्ये घाण साचली आहे.