एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा प्राणीजन्य आजार समितीची सभा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात बर्ड फ्लू संदर्भात आतापर्यंत १६ गावे व महापालिका हद्दीतील चार ठिकाणी मृत पक्षी आढळल्याच्या घटना घडल्या. त्यातून २८ पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून दोनच ठिकाणचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवितांना सर्व विभागांचा समन्वय असणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.