लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये कानाला मोबाइल ब्ल्यू ट्युथ लावून कॉपी करणाऱ्या एका परीक्षार्थीस केंद्र प्रमुखाने पकडून खदान पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून आरसेस इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीच्यावतीने तलाठी पदासाठी आॅनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. शुक्रवारी परीक्षेदरम्यान मलकापूर परिसरातील बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट येथील केंद्रावर परीक्षार्थी हर्षल विजय तायडे (२०, रा. वडाळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) हा शुक्रवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास कानाला मोबाइल ब्ल्यु ट्युथ लावून संगणकावर आॅनलाइन पेपर सोडवित होता. यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद आणि जवळील रुमाल वारंवार कानावर ठेवत असल्याने, केंद्र प्रमुख मोहन कांबळे यांना संशय आला. त्यांनी व केंद्र निरीक्षक विजय खेडकर यांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या कानाला मोबाइल ब्ल्यु ट्युथ असल्याचे दिसून आले. मोबाइल ब्ल्यु ट्युथद्वारे हर्षल तायडे हा कॉपी करीत असल्याचे समोर आल्यावर केंद्रप्रमुख मोहन कांबळे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ४२०, ६६, डी आयटी अॅक्ट, परीक्षा अधिनियम ७ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास कोतवालीचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्याकडे सोपविण्यात आले. न्यायालयाने या परीक्षार्थीची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)
तलाठी पदाच्या परीक्षेत कानाला ‘ब्ल्यू टूथ’ लावून कॉपी; परीक्षार्थीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 2:12 PM