लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रुग्णालयात चार ते पाच दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोना बाधित रूग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाची ही बेफिकिरीही रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील व्हीआरडीएल लॅबवरील ताण वाढला आहे. त्यामुळे चाचणी अहवाल तीन ते चार दिवसांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला प्राप्त होत आहेत. वेळेत अहवाल न मिळाल्याने संदिग्ध रुग्णांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. परिणामी पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी स्वॅब देण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही मनपाचा वैद्यकीय आरोग्य विभाग रुग्णाशी संपर्क साधत नसल्याने रुग्ण स्वत:हूनच रुग्णालयात दाखल होत आहेत.रुग्णालयात उपचारास सुरुवात झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर रुग्णांना तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तुम्ही कुठे आहात, असा प्रश्न मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेकडून केला जातो.त्यानंतर रुग्णाचा शोध घेण्यास सुरुवात केली जात आहे. तोपर्यंत रुग्णावर रुग्णालयात उपचारही सुरू झालेला असतो.हा प्रकार पाहता मनपाची वैद्यकीय यंत्रणा किती प्रामाणीकपणे कर्तव्य बजावत आहे,हे दिसून येत आहे. महापालिकेची ही बेफिकिरी अकोलेकरांसाठी घातक ठरणारी असून, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास रुग्णवाढीचा हा आलेख आणखी वर जाण्याची दाट शक्यता आहे.
प्रकार रुग्णाच्या जीवावर बेतणाराकारोना बाधित रूग्णांना चाचणी अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याने उपचारासाठी विलंब होत आहे. तोपर्यंत रुग्णाच्या फुप्फुसामध्ये ‘इन्फेक्शन’चे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आॅक्सिजन पातळी कमी होऊन हा प्रकार रुग्णाच्या जीवावर बेतणारा आहे.
घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला विचारणा केली जाणार आहे. कर्तव्यात कसूर आढळल्यास कारवाई केली जाईल.- संजय कापडणीसआयुक्त मनपा