अकोला : जानेवारी महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव काही प्रमाणात नियंत्रणात होता. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांवर होते, मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांवर आला. कोरोनाचा घसरता रिकव्हरी रेट चिंता वाढविणारा असून, नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
ऑक्टोबर २०२० नंतर जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात होता. पॉझिटिव्ह रुग्णांसह मृतांचा आकडाही कमी झाला होता, मात्र २०२१ च्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला. फेब्रुवारी महिन्यात रुग्णवाढीचा वेग वाढला असून महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा कहर होताना दिसून आला. महिनाभरात ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढले, त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे गत महिनाभरात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्याहून ७६ टक्क्यांवर आला. महिनाभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर जवळपास १६ टक्क्यांनी कमी झाला. अकोलेकरांसाठी ही चिंतेची बाब असून नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे.
लक्षणे कमी असतानाच उपचार घ्या
कोरोनाची लागण झाल्यानंतर काही लक्षणे दिसून येतात. या लक्षणांची तीव्रता कमी असतानाच रुग्णांनी कोविडची चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. त्यामुळे कमी वेळेत कोरोनातून बरे होण्यास मदत मिळेल. मात्र अनेक जण वेळेवर उपचार घेण्यास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मृत्यूदर २.३ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असली, तरी गत महिनाभरात कोरोनाचा मृत्यूदर कमी दिसून येत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस जिल्ह्यातील कोविड बाधितांचा मृत्यूदर २.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हे प्रमाण गत महिन्यात ३.२ टक्क्यांवर होते. मृत्यूच्या बाबतीत थोडा दिलासा मिळाला असला, तरी गत आठवडाभरात सरासरी दिवसाला दोन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे.