अकोला: मागील २० दिवसांत राज्यभरात सर्वत्रच कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून आली. रुग्णवाढीचे हे सत्र कायम असले, तरी अनेक रुग्ण बरे देखील होत आहेत, मात्र अकोल्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घसल्याचे दिसत आहे. सध्या अकोल्याचा रिकव्हरी रेट हा ७८.४ टक्क्यांवर असून, तो विदर्भात सर्वात कमी असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने चिंता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. मार्च महिन्यात कोरोनाचा कहर विदर्भासह उर्वरीत महाराष्ट्रातही दिसून आला. नागपूर, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली. या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याचे दिसून आले, मात्र आठवडाभरात अनेक जिल्ह्यांची स्थिती बदलली. प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घसरले होते, त्यामध्ये आता सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास तुलनेने अकोल्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय कमी दिसून येते. सध्यस्थितीत अकोल्यातील कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ७८.४ टक्क्यांवर असून, हा विदर्भात सर्वात कमी आहे. अकोलेकरांसाठी ही चिंतेची बाब असून, विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
मृत्यूदर घसरल्याचा दिलासा
वाढती रुग्णसंख्या आणि घसरलेला रिकव्हरी रेट हे प्रमाण चिंताजनक असले, तरी जिल्ह्याचा मृत्यूदर १.८ टक्क्यांवर आला आहे. गत महिन्यापर्यंत हे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा जास्त होते. मृत्यूदराचा आकडा कमी दिसत असला, तरी दररोज होणारे मृत्यू ही गंभीर बाब आहे.
अशी आहे विदर्भाची स्थिती (टक्केवारीत)
जिल्हा - रिकव्हरी रेट - मृत्यूदर
अकोला - ७८.४ - १.८
अमरावती - ९१.१ - १.३
नागपूर - ८४.२ - १.९
भंडारा - ९२.२ - २.१
बुलडाणा - ८७ - १.२
चंद्रपुर - ९३.९ - १.६
गडचिरोली - ९६ - १.१
गोंदिया - ९६.३ - १.२
वर्धा - ८९ - १.९
वाशिम - ८६.१ - १.४
यवतमाळ - ८४.२ - २.१