राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे, मात्र विभागात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दुसऱ्या लाटेची सुरुवात प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या अकोला मंडळातूनच झाली होती. प्रामुख्याने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रारंभी रुग्णसंख्या वाढीचा वेग लक्षणीय वाढला होता. त्यापाठोपाठ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढता होता. जून महिन्याच्या अखेरीस कोविडची दुसरी लाट ओसरू लागली. जुलै महिन्यात रुग्णसंख्या वाढ बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने डबलिंग रेटचा कालावधीही वाढत गेला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा डबलिंग रेट ६ हजार ५०८ दिवसांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील डबलिंग रेट २ हजार ८६४ दिवसांवर असून हा विभागात सर्वांत कमी आहे.
अशी आहे विभागाची स्थिती
जिल्हा ५ ते ११ जुलै - १२ ते १८ जुलै - १९ ते २५ जुलै
अकोला -४६११.८५ - ६९८०.१२ - ६५०८.८९
अमरावती - २२२१.२२ - ३७५७.१ - ५१५५.९४
बुलडाणा - २९८०.४७ - ३६१८.८६ - २८६४
वाशिम - २२१२.१८ - ४२००.९५ - ६७२७.८२
यवतमाळ - ७८४६.८२ - १५३७३.८६ - ३६९०५.५१
विभागातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. रुग्णवाढीचा वेग मंदावल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला आहे, मात्र नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला