लक्षणे असूनही यातील बहुतांश रुग्णांचे कोविड चाचणीचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांच्यावर सारीचे रुग्ण म्हणून उपचार केले जात आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढीत लक्षणीय घट दिसून आली. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला, मात्र जिल्ह्यात साथीच्या तापाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अशातच गत काही दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात कोविडचे संदिग्ध रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत कोविडचे संदिग्ध रुग्ण आयसीयू, लेबर रूम आणि कोविडच्या संदिग्ध रुग्ण वाॅर्डात उपचार घेत आहेत. कोविडच्या बहुतांश संदिग्ध रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असली, तरी त्यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे या रुग्णांवर सारीचे रुग्ण म्हणून उपचार केले जात आहेत. कोरोना, सारीचे रुग्ण कमी झाले, तरी व्हायरल तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
जीएमसीत सारीचे १५ रुग्ण दाखल
सर्वोपचार रुग्णालयात सारीचे सुमारे १५ ते २० रुग्ण दाखल असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त व्हायरल फिव्हरशी संबंधित रुग्ण दाखल आहेत.
यांची घ्या काळजी
लहान मुले
ज्येष्ठ नागरिक
कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्ती
मधुमेह
हृदयरोग असलेली व्यक्ती
कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात असले, तरी संदिग्ध रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने त्यांच्यावर सारीचा रुग्ण म्हणून उपचार केले जातो, मात्र सद्यस्थितीत सारीचे रुग्णही नियंत्रणात आहेत. व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उप-अधीक्षक, जीएमसी, अकोला