अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, शनिवार १९ जून रोजी जिल्ह्यात केवळ २७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर तब्बल ९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५७३८३ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीलएल लॅबकडून शनिवारी एकूण ६४५ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ १७ पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ६२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यात तीन, तेल्हारा तालुक्यात दोन, अकोट तालुक्यात तीन, पातूर तालुक्यात दोन, मुर्तिजापूर तालुक्यात दोन, तर अकोला मनपा क्षेत्रात पाच रुग्ण आढळून आले. शुक्रवारी दिवसभरात पार पडलेल्या १०९४ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
९४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३ , उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील आठ, खासगी कोविड सेंटर्समधील १३ तर होम आयसोलेशन मधील ६० अशा एकूण ९४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
९३१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,३८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,३३४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,११८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.