अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये दोन, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये चार अशा एकूण सहा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी ३१० जणांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी मुर्तीजापूर व बाळापूर येथे प्रत्येकी एक असे केवळ दोन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. उर्वरित ३०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या ९१५ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून, यामध्ये मुर्तीजापूर येथील दोघांसह, तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक असे चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
६८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील चार, अकोला अक्सीडेंट क्लिनिक येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ६२ अशा एकूण ६८ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१६४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,६५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११३० मृत झाले, तर ५६,३६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत १६४ जणांवर उपचार सुरू आहेत.