अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय घटले असून, गत काही दिवसांपासून बाधित होणार्यांपेक्षा बरे होणार्यांची संख्या वाढली आहे. गुरुवार, ८ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सहा व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सहा असे एकूण दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले, तर ७० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी ४२२ जणांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोट, मूर्तीजापूर व बाळापूर येथे प्रत्येकी एक व अकोला शहरात तीन असे सहा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. उर्वरित ४१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. बुधवारी करण्यात आलेल्या ७१७ रॅपिड ॲंटिजन चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
७० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, आयकॉन हॉस्पिटल येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील एक, आधार हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६४ अशा एकूण ७० जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१०४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,६६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११३० मृत झाले, तर ५६,४३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत १०४ जणांवर उपचार सुरू आहेत.