अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, गुरुवार, १ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये एक अशा एकूण चार नव्या रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, चिखलगाव येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने एकूण मृतकांचा आकडा १,१२८ झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी एकूण ५३९ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोट येथील दोन व अकोला शहरातील एक अशा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित ५३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. बुधवारी करण्यात आलेल्या ११०९ चाचण्यांमध्ये केवळ एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
२७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्थ येथील एक, तर होम आयसोलेशन मधील २० अशा एकूण २७ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३५३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,११८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.