अकोला : जिल्ह्यात सोमवार, २१ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या १,१२० झाली आहे. गत चोविस तासांत आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ नऊ नवे रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,४२३ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीलएल लॅबकडून सोमवारी एकूण २५९ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ सात पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित १५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रविवारी ४३० रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या यामध्ये केवळ दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोमवारी दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली. यामध्ये कडोसी ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला, व गाडेगाव ता.तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून, दोघींनाही १४ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
१६८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, खासगी कोविड रुग्णालयांममधील १३, तर होम आयसोलेशन मधील १५० अशा एकूण १६८ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७१८ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,४२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,५८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.