अकोला : कोरोना संसर्गाची साखळी जवळपास खंडीत झाली असून, शनिवारी (७ ऑगस्ट) रोजी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करण्यात आलेल्या ८२५ चाचण्यांमध्ये (आरटीपीसीआर ३७० व रॅपिड ॲन्टिजेन ४५५) एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ३७० आरटीपीसीर चाचणी अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ४५५ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.
ॲक्टिव्ह रुग्ण ५२
जिल्ह्यात आतापर्यंत ५७७८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी ५६५९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ११३४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.