अकोला : आठवडाभरापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढीचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे, मात्र मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने अकाेलेकरांची चिंता कायम आहे. शुक्रवारी त्यात आणखी सात जणांच्या मृत्यूची भर पडली, तर १५२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. धोका अजूनही टळला नसल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, ७ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यात अडोसी, ता. बाळापूर येथील ९५ वर्षीय पुरुष रुग्णासह बाळापूर तालुक्यातील भातवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ३८ वर्षीय पुरुष, पारस येथील ७३ वर्षीय महिला, खडकी येथील ६५ वर्षीय पुरुष, व्याळा येथील ४३ वर्षीय महिला, माणिक टाॅकीज परिसरातील ६८ वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. यासह १५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यामध्ये ९३ अहवाल आरटीपीसीआर चाचणीचे, तर उर्वरित ५९ पॉझिटिव्ह अहवाल रॅपिड ॲन्टिजन चाचणीतील आहेत. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख काही प्रमाणात घसरल्याचे दिसत असले तरी, मृत्यूचे सत्र कायम आहे. अकोलेकरांवरील कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या (आरटीपीसीआर अहवाल)
तालुका - रुग्ण
मूर्तिजापूर - १८
अकोट - ०१
बाळापूर - ०८
बार्शिटाकळी - ०४
पातूर - ०३
तेल्हारा - ०८
अकोला - ५१ (ग्रामीण - १४, मनपा - ३७)
४१७ जणांना डिस्चार्ज
रुग्णसंख्या वाढीचा आलेख घसरत आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. शुक्रवारी आणखी ४१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यातील ३७० गृह विलगीकरणातील रुग्ण आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३ हजार ३७६ पर्यंत खाली आला आहे.