अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट आता ओसरली असून, सोमवार, १४ जून रोजी जिल्ह्यात केवळ १४ (आरटीपीसीआर ५, रॅपिड ॲन्टिजेन ९) नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ५७१६० झाली असून, एकूण कोरोनाबळींचा आकडा १११४ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित १०४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये महागाव ता. बार्शीटाकळी येथील ४२ वर्षीय महिला व आंबोडा ता. अकोट येथील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २ व १ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
१४४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, खासगी कोविड रुग्णालयांमधील २७, तर होम आयसोलेशन मधील ११०अशा एकूण १४४ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,२९० ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,१६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५४,७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,२९० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.