अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लाट आता पूर्णपणे ओसरल्याचे चित्र असून, बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, आणखी १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आता जिल्ह्यात केवळ १७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. मे व जून महिन्यात ही लाट सर्वोच्च पातळीला होती. जून महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा सात हजारांच्या घरात पोहोचला होता. आता लाट पूर्णपणे ओसरली असून, जिल्ह्यात आता केवळ १७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५७, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांचे २७१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
१३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बुधवारी आणखी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ५६,६५३ झाली आहे. आतापर्यंत ११३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.